मुंबई | वेगवेगळ्या कारणांनी कायम वादात राहणारे सहकारमंत्री सुभाष देशमुख पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. त्यांच्या ‘लोकमंगल मल्टिस्टेस्ट सहकारी संस्थे’ला दिलेले अनुदान रद्द करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे लोकमंगलने 25 कोटी रूपयांचे अनुदान लाटले होते. बोगस कागदपत्रांच्या आधारे अनुदान लाटल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर राज्य सरकारने अनुदान रद्द केले आहे.
सहकारमंत्री सुभाष देशमुख हे ‘लोकमंगल’मुळे कायमच वादात राहताना दिसत आहेत. नोटबंदी झाली तेव्हा याच ‘लोकमंगल’च्या गाडीत नवीन नोटा सापडल्या होत्या. निवडणुकीच्या काळातही याच ‘लोकमंगल’च्या गाडीत संशयास्पद रक्कम आढळून आली होती. ते निस्तारले असतानाच आता पुन्हा बनावट कागदपत्राच्या आधारे अनुदान लाटल्याचे प्रकरण समोर आले आहे.
‘लोकमंगल’ संस्थेने बोगस कागदपत्रांच्या आधारे दुध भुकटी कारखान्यासाठी 25 कोटी रूपये अनुदान लाटल्याचा आरोप होता. त्यापैकी 5 कोटी अनुदानाची रक्कम दुध भुकटी प्रकल्पासाठी मिळाली होती. ती परत घेण्याबाबत दुग्ध विकास आयुक्तांना कारवाई करण्याचे सरकारने आदेश दिले आहेत. यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना मोठा झटका बसला आहे.