मुंबई । शिवसेनेतील नाराज आमदारांच्या गटाला सोबत घेत ठाकरे सरकारमधून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली आणि आज अखेर या नव्या सरकारने विधिमंडळात आपलं बहुमत सिद्ध केलं आहे. आज विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूने शिंदे गट आणि भाजप आमदार अशी एकूण १६४ मते पडली, तर ९९ आमदारांनी विरोधात मतदान केलं. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत रोखठोक भाषण केले. यावेळी बोलताना ED मुळेच बंडखोर आमदार आमच्यासोबत आले असा गौप्यस्फोट केला. मात्र ED म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र असं आहे असे फडणवीस यावेळी म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भाषणाच्या सुरुवातीलाच ‘शिवसेना-भाजप युतीचं’ सरकार असा उल्लेख करण्यात आला. या सभागृहाने शिवसेना-भाजप युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला. त्यांचं मी अभिनंदन करतो असं म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य विचारांचे पाईक असलेले आणि कर्मावर निष्ठा असलेले एकनाथ शिंदे आहेत. जे संघटक आणि जनतेचे सेवेकरी आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे या दोघांच्या प्रभावामुळे ८० च्या दशकामध्ये त्यांनी शिवसेनेत सक्रिय काम सुरू केलं. एक साधा कार्यकर्ता, शाखा प्रमुख ते वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत ते मुख्यमंत्री झालेत अशा शब्दात फडणवीस यांनी शिंदे यांचे कौतुक केले.
आनंद दिघे यांनी शिंदे यांची १९८४ मध्ये किसननगर शाखा प्रमुख म्हणून निवड केली. या नंतर दिघे साहेबांच्या नेतृत्त्वात अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. सामान्याला न्याय देण्यासाठी ते आंदोलन करायचे. अनेक केसेस घेतल्या, तुरुंगात गेले. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी जनसेवा केली असे फडणवीस यांनी म्हटले.