हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडी चौकशी सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध केला जात आहे. त्यातच भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गांधी कुटुंबाने 2 हजार कोटींची संपत्ती हडप केली असा गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.
फडणवीस म्हणाले, एजीएल ही कंपनी 1930 मध्ये तयार झाली होती. स्वातंत्र्यसंग्रामात स्वत:चं वृत्तपत्र असावं म्हणून स्वातंत्र्यसेनानींनी एजीएलची स्थापना केली होती. 5 हजार स्वातंत्र्य सैनिक या कंपनीचे मालक होते. ही राष्ट्रीय संपत्ती असून खासगी संपत्ती नाही. २०१० मध्ये राहुल गांधी कुटुंबाने यंग इंडिया नावाची कंपनी स्थापन केली आणि एजीएलची संपत्ती यंग इंडियाला ट्रान्सफर केली. आणि एजीएलच्या 2000 शेअर वर आपली मालकी प्रस्थापित केली.
ते पुढे म्हणाले, काँग्रेसने देशातील जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे. या प्रकरणात हे भ्रष्टाचार झाल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर ईडीने राहुल गांधी यांची चौकशी केली. काँग्रेस कडून आता व्हिक्टम कार्ड खेळला जात आहे. काँग्रेसने याचा बाऊ करण्यापेक्षा चौकशीला सामोरे गेले पाहिजे असे फडणवीस यांनी म्हंटल.