हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता दुकानात आणि सुपरमार्केटमध्येही वाईन मिळणार आहे. त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरकार कडून सांगण्यात येत आहे. द्राक्षापासून वाईन तयार होत असल्याने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हंटल होत त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार वर टीका केली आहे. शेतकऱ्यांचे नाव फक्त पुढे केलं आहे, मात्र यामागील अर्थकारण मात्र वेगळंच आहे असा आरोप फडणवीसांनी केला आहे.
फडणवीस म्हणाले, ‘काही लोकं गोंडसपणे शेतकऱ्यांचं नाव पुढे करत आहेत. पण हा निर्णय शेतकऱ्यांसाठी नाही. काही लोकांनी नव्याने दारुच्या कंपन्या आणि एजन्स्या घेतल्या आहेत. या लोकांच्या भल्यासाठीचा हा निर्णय घेण्यात आला आहे. वाईन तयार करणाऱ्या एका फार मोठ्या उद्योजकासोबत नेमकं कोणाची बैठक झाली?? ती कुठे नेमकी झाली??ती बैठक विदेशात झाली का, अशी एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती करत या निर्णयामागे मोठं अर्थकारण आहे असे फडणवीसांनी म्हंटल.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच जे राज्यात वाइन विक्रीला विरोध करत आहेत ते शेतकऱ्यांचे शत्रू आहेत अस म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. द्राक्षापासून वाईन तयार होत असल्याने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. भाजपला शेतकऱ्यांच्या हिताची चिंता नाही. विरोध करणे हे त्यांचे काम आहे. शेतकऱ्यांना वाईनरी उद्योगाकडून आर्थिक मदत मिळत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे असे राऊत म्हणाले.