टीम हॅलो महाराष्ट्र। अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या, शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा, अशी मागणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात, “तानाजी मालुसरे हे एक वीर योद्धा होते. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्यात त्यासाठी हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा यासाठी तो करमुक्त करण्यात यावा.”
देशातील इतर राज्यांनी हा चित्रपट करमुक्त केला आहे, त्यामुळे तानाजींचे कार्यक्षेत्र असलेल्या महाराष्ट्रात हा निर्णय त्वरेने होणे गरजेचे आहे, असेही फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही महसूलमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तान्हाजी चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश आहे. सध्या, तानाजी अन् छपाक चित्रपटावरुन देशात राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेससह डाव्या पक्षांकडून छपाकला समर्थन देण्यात येत आहे, तर भाजपाकडून तानाजी चित्रपटाला पाठिंबा मिळत आहे