हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विदर्भ आणि मराठवाड्यातील वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली. राज्यपालांनी 12 सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करू, असं अजित पवार यांनी सांगितलं. त्याला फडणवीस यांनी कडाडून विरोध केला. हा विदर्भ-मराठावाड्यातील जनतेला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.
वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही? असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. अजित पवार यांनी आश्वासन देऊन ७२ दिवस झाले आहेत. आश्वासन पूर्ण करणार आहात की नाही एवढंच सांगावं,” अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यावर प्रत्युत्तर देताना विकास महामंडळ आम्ही स्थापन करु, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. बजेटमध्ये तसा निधी देऊ. आमचं लवकरात लवकर करायचं ठरलं आहे. पण मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आहे ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करु.अस अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी हे उत्तर दिल्यानंतर फडणवीस यांनी लगेचच त्याला हरकत घेत पवार यांच्या विधानाची चिरफाड केली. अजितदादा जे तुमच्या पोटात होतं ते ओठावर आलं. 12 सदस्यांसाठी विदर्भ आणि मराठवाड्याला ओलीस धरणं योग्य नाही. मराठवाड्यातील लोक हे कदापीही सहन करणार नाही. राज्यपाल आणि तुमचं जे काही सुरू आहे. त्याच्याशी या सभागृहाला काहीही घेणं देणं नाही. वैधानिक विकास महामंडळ हा आमचा हक्क आहे. आम्ही भीक मागत नाही. आम्ही भिकारी नाही. वैधानिक विकास महामंडळ करा किंवा करू नका, ते आमच्या हक्काचं आहे, आम्ही मिळवून घेऊच, असं फडणवीस यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’