फडणवीसांनी सभागृहात थेट ठाकरे गटाच्या आमदाराला दिली ऑफर; म्हणाले की, तुम्हालाही मंत्रिपद…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनात कोणता आमदार गळाला लागतोय का? याची चाचपणी भाजपकडून केली जाऊ लागली आहे. विरोधी पक्षातील काही आमदार शिंदे-भाजप सरकारमध्ये येण्यास तयार असल्याची अनेकवेळा भाजप नेत्याकडून विधाने करण्यात आली आहे. आज तर अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरु असताना भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांसमोर ठाकरे गटाचे नेते, आमदार सुनील प्रभू यांना थेट मंत्रिपदाची ऑफरचं दिली. या घडलेल्या प्रकाराची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी शिंदे सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी तयारी केली आहे. त्याचाच प्रत्यत आज दिसून आला. शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार प्रतोद सुनील प्रभू यांनी सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांच्या बंगल्याला केलेल्या रंगरंगोटीचा मुद्दा उपस्थित केला. “विद्यमान सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नाही. तरीही अधिवेशनात राज्यमंत्र्यांचे सर्व बंगले सजवण्यात आले आहेत. या बंगल्यांची आवश्यकता नसताना ते सजवले गेले आहेत. एका बाजूला सरकार प्रकल्पांवरती करोडो रुपयांचे कर्ज उभे करत आहे. दुसऱ्या बाजूला सरकारी पैशांचा चुराडा होत आहे. हा पैशांचा अपव्यय आहे,” असे प्रभू यांनी म्हंटले.

त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत प्रभू यांना थेट मंत्रीपदाची ऑफरच देऊ केली. “सार्वजनिक बांधकाम विभागाला थोडीच माहिती असते, आम्ही कधी मंत्रीमंडळ विस्तार करणार आहे. आम्ही अधिवेशनाच्या काळातही करु शकतो. तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. तुम्हाला संधी हवी आहे का?, त्यामुळे अधिवेशनाच्या निमित्ताने रंगरंगोटी केली जाते. कोट्यावधी नाहीतर, जेवढे आहेत, त्याचा हिशोब पाठवून देतो,” असे फडणवीस यांनी म्हंटले. सभागृहात फडणवीसांनी प्रभूंना दिलेल्या ऑफरची चर्चा सध्या राजिलत वर्तुळात चांगलीच केली जात आहे.