हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीवेळी दोघांच्यात तब्बल दीड तास खलबतं झाली. मात्र, दोघांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली? आणि फडणवीसांनी ठाकरेंची अचानक का भेट घेतली? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संपूर्ण राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा लागली आहे. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेता भाजपकडून तशी तयारीही केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची घेतलेली भेट हि महत्वाची मानली जात आहे. मात्र, या चर्चेबाबत दोघांच्याकडूनही कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे राजकीय क्षेत्रात केवळ तर्कवितर्क लढवले जात आहेत.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/fj8cvLjbix
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 15, 2022
यावेळी दोघांच्यात झालेल्या भेटीत मनेसेचे आमदार राजू पाटील यांना भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद दिले जावे, याबाबत चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर आगामी निवडणुकीत भाजप – मनसे एकत्रित निवडणूक लढवणार तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.