हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणावरून सरकारला घेरण्याची एकही संधी विरोध पक्ष भाजप सोडत नाही. दरम्यान, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवं. त्याबाबत दुमत नाही, असं सांगतानाच ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरून त्याला तीव्र विरोध करू, असा इशारा भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हानही त्यांनी दिलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का दिला जाणार नाही, याबाबतचं कलम टाकलं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिलं आहे, असं सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत आम्ही ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसी आरक्षणात कोणीही वाटेकरी नको. ही भाजपची अधिकृत भूमिका आहे. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही ओबीसी आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हानच त्यांनी यावेळी दिलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’