उपमुख्यमंत्री होणं माझ्यासाठी धक्का होता, पण पक्षाने…; फडणवीसांची जाहीर कबुली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील वर्षी जूनमध्ये भाजपने शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करत पुन्हा एकदा राज्यातील सत्ता मिळवली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असं आपणच पक्षाला सांगितलं असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच पक्षाने आपल्याला ज्यावेळी उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं त्यावेळी धक्का बसला अशी कबुली सुद्धा फडणवीसांनी दिली. ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात बोलताना राज्यातील सत्तासंघर्षाबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

फडणवीस म्हणाले, ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि आमचं सगळं बोलणं झालं की आता हे सरकार बदललं पाहिजे, आपल्या विचाराने सरकार चालू शकत नाही, तिकडे हिंदुत्ववाद्यांचा जीव गुदमरतोय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी मी हा विषय मांडला की, शिंदेंनी मुख्यमंत्री झालं पाहिजे. मी माझ्या पक्षाकडे गेलो. पक्षाला मी सांगितलं की, शिंदे साहेबांना आपण मुख्यमंत्री केलं पाहिजे. पक्षाला कन्व्हिन्स करण्यासाठी मला बराच वेळ लागला. माझ्या पक्षाने लगेच ते मान्य नाही केलं. परंतु मी पक्षाला म्हटलं, इतकं मोठं पाऊल एकनाथ शिंदे उचलत आहेत, अशा परिस्थितीत त्यांचं नेतृत्त्व असलं पाहिजे. त्यांच्या लोकांना कॉन्फिडन्स देईल ते.

त्यावेळेस मी पक्षाला सांगितलं होते कि मी सरकार मध्ये राहणार नाही. एकवेळ मी पक्षाचा अध्यक्ष होईन आणि २ वर्ष मेहनत करून पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजपला नंबर १ करेन. त्यावेळी सगळं ठरलं. ज्यावेळी आम्ही राज्यपालांना पत्र द्यायला गेलो त्यावेळी फक्त मला, एकनाथ शिंदेंना आणि भाजपच्या दिल्लीतील ३ नेत्यांनाच माहित होते कि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. राज्यपाल सुद्धा पत्र पाहून आश्चर्यचकित झाले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील, ही घोषणा मी जेव्हा पत्रकार परिषदेत केली. तेव्हा माझ्या चेहऱ्यावर जराशीही नाराजी नव्हती, तर माझ्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद होता. मात्र माझा हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण घरी गेल्यानंतर मला आमच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं की, तुला उपमुख्यमंत्री व्हावं लागेल. हा माझ्यासाठी धक्का होता,’ अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

‘मुख्यमंत्री राहिलेलो असताना त्याच्यापेक्षा खालच्या उपमुख्यमंत्रिपदावर जावं लागतंय, याचं दु:ख नव्हतं मला. कारण माझ्या नेत्यांनी सांगितलं तर मी चपराशीही व्हायला तयार आहे. पण आपण ज्या प्रकारचं राजकारण करतो, त्याच्यामध्ये लोकं काय म्हणतील की सत्तेसाठी हा किती हपापलेला आहे? कालपर्यंत हा मुख्यमंत्री होता आणि आता सत्तेसाठी उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाला आहे. मात्र नंतर माझ्या नेत्यांनी हे सर्व अत्यंत वरचा स्तरावर नेलं. त्यांनी सांगितलं की आम्ही सांगतोय म्हणून हा उपमुख्यमंत्री होत आहे. या नरेटिव्हमुळे नंतर कोणाच्या मनात शंका राहिली नाही. कदाचित मुख्यमंत्री होऊन माझ्याबद्दल जनतेच्या मनात जी भावना निर्माण झाली असती त्यापेक्षा अधिक उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे झाली असेही फडणवीस यांनी म्हंटल.