हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ात परतीच्या पावसामुळे पिकांचं खूप मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. शेतकर्याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाच दौरा करणार आहेत. विशेष गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीमधून प्रारंभ होईल.
बारामतीपासून हा दौरा सुरु होणार असून कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करणार आहेत. त्यानंतर ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्या दिवशी ते उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्या दिवशी ते हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार 19 आणि 20 तारखेला मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. ते तुळजापूर, उमरगा,औसा, परंडा ,उस्मानाबादमधील भागांना भेटी देतील. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजपासूनच बारामतीमधून आपल्या दौऱ्याला प्रारंभ केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’