पंढरपूर | राज्यातील सरकारने भारत भालके नानांच्या हयातीत १ टीएमसीच्या ऐवजी २ टीएमसी पाणी दिले. आचारसंहिता संपल्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना पाणी देण्याचे काम पूर्ण आम्ही महाविकास आघाडी करणार आहे. मंगळवेढ्याला पाणी मिळाले नसेल तर त्यांचे पाप केवळ देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीच्या प्रचार सभेत जयंत पाटील बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, योजनेसाठी देवेंद्र फडणवीस मोदींच्याकडून पैसे मागून आणले असे सांगतात. पाच वर्षात भाजपाचे सरकार असताना फडणवीस यांनी योजना का पूर्ण करू शकले नाहीत. भरत नाना केवळ काॅंग्रेसचे आमदार आहेत. ते आपल्याकडे येत नाहीत, मुजरा करत नाहीत म्हणून भाजपाने मंगळवेढ्याला पाणी दिले नाही.
पुढे जयंत पाटील म्हणाले, भगीरथ भालकेंच्या रूपाने एक तरूण चेहरा तुम्हांला दिला आहे. तेव्हा आपण भालके नानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भगीरथ यांना विधानसभेत पाठवा. जे -जे या मतदार संघाच्या विकास कामासाठी पाहिजे ते आम्ही करू. एका बाजूला धनशक्ती आहे, तर एका बाजूला पुराणात भगीराथाने गंगा आणण्याचे काम केले होते. तसेच कृष्णा नदीचे पाणी आणण्यासाठीच भालके नानांनी त्यांचे नांव भगीरथ ठेवले. आता तुम्ही मतदारांनी भगीरथला विधानसभेत पाठवावे.
भारत भालके आपल्याला सोडून गेले. पवार साहेबांनी शेवटी भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. अडचणीच्या वेळी राष्ट्रवादी ही आपल्या माणसांच्या पाठीमागे उभी राहते असे जयंत पाटील यांनी सांगितले.