विशेष प्रतिनिधी । महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट होऊन २४ तासही झालेले नसताना राज्यात सरकार कोण स्थापणार याविषयी वेगवेगळे तर्क लावले जाऊ लागले आहेत. शिवसेनेसोबत बोलणी फसली तर देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम करावं लागण्याची नवी शक्यता समोर आली आहे. या परिस्थितीत शिवसेना राष्ट्रवादीच्या थेट तर काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्यावर सरकार स्थापनेवर दावा करू शकते. भाजप-शिवसेना महायुतीचं एकूण बळ १५९ आमदारांचं आहे तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आणि काही अपक्ष मिळून हे संख्याबळ १७० पर्यंत पोहचत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं ‘मी पुन्हा येणार’ हे वक्तव्य ‘विरोधी’ पक्षनेतेपदासाठी होतं का? याची चर्चा रंग धरू लागली आहे.
सरकार स्थापन करण्यासोबत मुख्यमंत्रीपद कुणाकडे राहणार आणि किती काळ याबाबत सस्पेन्स कायम असून सत्तेच्या चाव्या आता उद्धव ठाकरेंकडे आल्याचं चित्र पहायला मिळत आहे. जागा वाटपाबाबत भाजपची अडचण आम्ही समजून घेतली, पण प्रत्येकवेळी ऍडजस्ट करणं आम्हाला जमणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सूचक पद्धतीने मुख्यमंत्रीपदावर आपला दावा सांगितला आहे.
आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करत शिवसेनेने ही निवडणूक लढवली होती. याऊलट भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची आशा होती, जी पूर्णपणे फोल ठरली. गतनिवडणुकीपेक्षा १८ ते २० जागांमध्ये घट झाल्याने भाजपची अवस्था जिंकूनही हरल्यासारखी झाली आहे. शरद पवारांनी या एकूण राजकीय वातावरणाचं ‘सत्तेचा उन्माद’ या शब्दांत केलेलं वर्णन तंतोतंत लागू पडताना दिसत आहे. शिवसेनेने पारदर्शकपणे पुढं जाऊ असा पवित्रा घेतला असला तरी मागील ५ वर्षांतील भाजपकडून शिवसेनेला ज्या प्रकारची वागणूक मिळाली त्यानुसार ‘आधी मुख्यमंत्रीपद द्या नायतर मग विरोधात बसा’ असाच विचार सध्या शिवसेना करत असणार हे मात्र नक्की..!