परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
यावर्षी परभणी जिल्ह्यात वरुणराजाची चांगली कृपादृष्टी झाली असून सतत पडणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील जलाशयातही पाणीसाठ्याची चांगलीच वाढ होत आहे. रात्री जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या जोरदार पावसाने नदी नाल्यांना पूर आला असून गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या उच्च पातळी
बंधाऱ्यां पैकी जिल्ह्याच्या सीमेवर सुरुवातीला असलेला ढालेगाव उच्च पातळी बंधारा तुडुंब भरलाय. सकाळपासूनच या बंधाऱ्यातून आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पाथरी तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात असणारा ढालेगाव उच्च पातळी बंधारा गुरुवारी रात्री शेजारील महसुल मंडळात झालेल्या अतिवृष्टीने ९६ टक्के भरला. यावेळी हादगाव महसुल मंडळात ८२ मिमी तर पाथरी महसुल मंडळात ७१ मिमी पाऊसाची नोंद झालीय. त्यामुळे सकाळी ११ .४५ मिनिटांनी या बंधाऱ्याच्या गेट क्र .८ मधून ८८२५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलायं. बंधाऱ्यातील पाणी पातळी ८५ टक्क्यावर येईपर्यंत हा विसर्ग चालूच राहणार आहे अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे उपविभागीग पाथरी चे अभियंता दिवाकर खारकर यांनी सांगितले आहे. हे सर्व पाणी तालुक्यातील तारूगव्हाण बंधाऱ्याचे काम निर्माणाधीन असल्याने मुदगल बंधाऱ्यात अडवले जाणार आहे. मुदगल बंधाऱ्यात यापूर्वीच २२ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. अशीही माहिती खारकर यांनी दिली.
दरम्यान गुरुवर व शुक्रवारच्या मध्यरात्री जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून यावेळी सर्वाधिक पावसाची नोंद सेलू व पूर्ण तालुक्यात करण्यात आले आहे दोन्ही तालुक्यात ५९ .४० मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. तर त्यापाठोपाठ पाथरी५४ .३३, परभणी ३०.२५, सोनपेठ ३० .००, जिंतूर २८ .८३, मानवत २२ .००, तर पालम ४ . ३३, गंगाखेड ३ .७५ मिमी एवढ्या सरासरीचा पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सरासरी ३२.४८ मिमी एवढा पाऊस नोंदवला गेला असून मोसमी पाऊस सुरू झाला तेव्हापासून दहा जुलै पर्यंत २८४ .९६ मिलिमीटर एवढं पर्जन्यमान झालायं.