माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून.., राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

0
145
Dhananjay Munde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर काही धक्कादायक फोटो समोर आले आहेत. या फोटोंमुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर अखेर आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारत तो पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. तसेच, या सर्व घडामोडींमध्ये धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर पोस्ट करत राजीनाम्यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.

त्याचबरोबर, “बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे.” असे मुंडे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांची भूमिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, धनंजय मुंडे यांनी स्वतः राजीनामा सादर केला असून तो स्वीकारण्यात आला आहे. त्यांनी हा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. त्याचबरोबर, “धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे.” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हणले आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर बीड जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आता या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीला वेग आला आहे. त्यामुळे आता राजकीय हालचाली काय घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.