औरंगाबाद | ‘मोदींनी दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणून सांगितले. तुम्हाला वाटले नोकरी नही मिलेगी तो, छोकरी कैसे मिलेगी आणि छोकरी नाही मिळाली तर हम दो हमारे..कैसे होंगे? पण आता तुमच्या सुखी संसाराचे स्वप्न भंगले आहे. मोदींनी देशातील ५५ कोटी तरुणांना फसवले आहे.’ असा जोरदार टोला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.
औरंगाबाद येथील मराठवाडा विभाग राष्ट्रवादी युवक काँग्रेस बुथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळाव्यात धनंजय मुंडेंनी मोदी-फडणवीस सरकारचा खुमासदार शब्दात समाचार घेतला. मोदी लाटेवर स्वार झालेल्या तरुणांना त्यांनी आपल्या भाषणातून चांगलेच चिमटे काढले. ते म्हणाले, ‘मोदी बाबाने देशातील सर्व जनतेला फसवले, तरुणही फसले. आज चार वर्षानंतरची परिस्थिती काय तर नोकरीही नाही, छोकरीही नाही आणि हम दो हमारे दो ही नाही. बर आता गाडीत पेट्रोल टाकून आपापलं पहावं, तर ती सोय देखील मोदींनी ठेवली नाही. पेट्रोल शंभरी पार करायच्या तयारीत आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘पण यात तुमचा दोष नाही, सोशल मीडियावरच्या प्रचाराला तुम्ही भुललात. पण आता तुमच्या मनात असलेली आग येणाऱ्या काळात दिसली पाहिजे, सरकारच्या विरोधात तुम्ही पेटलात तरच तुमच्या अंगात तरुणांचं रक्त आहे असं समजल जाईल. कारण युवकांची फळी मजबूत असेल त्या पक्षालाच देशात आणि राज्यात सत्तेवर येता येईल.’
खोटं बोलून, फेकाफेकी करुन देखील आज भाजप सत्तेवर आहे, आणि आम्ही लोकांची काम करुनही सत्तेच्या बाहेर अशी खंत देखील धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुथ याद्यांचा नीट अभ्यास करावा. आपल्याला पडणारे मतदान, न पडणारे मतदान, काठावरचे मतदार अशी वर्गवारी करावी. तसेच नव्या मतदारांची नोंदणी करण्यावर सर्वाधिक भर द्यावा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी दिला. पहिल्यांदा जो पक्ष नव्या मतदारांची नोंद करतो ते मतदार कधीच त्या पक्षापासून लांब जात नाही असा माझा अनुभव आहे. त्यामुळे नवीन मतदार नोंदणीवर भर द्या असे आवाहन करतांनाच “चलो आज अपना हुनर आजमाते है, तुम तीर आजमाओ हम जिगर आजमाते है’ असा शेर सादर करत मुंडे यांनी तरुणाईची नस पकडली.