Tuesday, June 6, 2023

मुनगंटीवार दिसताच धनंजय मुंडेंची हटके स्टाईल घोषणाबाजी; म्हणाले की..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट व विरोधातील महाविकस आघाडीमध्ये जोरदार आरोप- प्रतारोप होण्याची शक्यता आहे. त्यातच अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गद्दार सरकारचा धिक्कार असो!! 50 खोके, एकदम ओक्के अशा घोषणाबाजी महाविकास आघाडीकडून करण्यात येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाहून दिलेल्या घोषणेने सर्वांचे लक्ष्य वेधले.

सुधीर मुनगंटीवार विधानभवनात जात असताना धनंजय मुंडे यांनी सुधीर भाऊंना कमी दर्जाचे खात देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी हटके स्टाईल घोषणा देत उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच संजय शिरसाठ याना मंत्रिपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… आशिष शेलार याना ,मंत्रिमंडळात स्थान न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत आसपासचा परिसर दणाणून सोडला.

दरम्यान, अधिवेशनादरम्यान महाविकास आघाडीच्या एकजुटीचे दर्शन पहायला मिळाले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते यावेळी एकत्रितपणे सरकारवर तुटून पडल्याचे दिसले. त्यामुळे भविष्यातही महाविकास आघाडी अशीच एकत्र राहणार का हे पाहावं लागेल.