औरंगाबाद – औरंगाबादेत सोमवारी 14 नव्या ओमायक्राॅन रुग्णांचे निदान झाले असून, आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. दरम्यान, सर्व रुग्ण आता निगेटिव्ह आहेत. औरंगाबादेतील आतापर्यंत आढळेल्या एकूण ओमायक्राॅनच्या रुग्णांची संख्या आता 19 झाली आहे.
ओमायक्राॅन लागण आतापर्यंत परदेशवारी करून आलेल्यांनाच होत असल्याचे समोर येत होते. परंतु परदेशवारी केलेली नसतानाही ओमायक्राॅन गाठत आहे. शनिवारी दोन रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला होता. यातील 36 वर्षीय तरुण डिसेंबरमध्ये पश्चिम आफ्रिकेहून परतला आहे, तर 27 वर्षीय कोरोना योध्द्या तरुणीने कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. सुदैवाने हे दोघेही आता निगेटिव्ह आहेत. अवघ्या दोन दिवसांनी औरंगाबादेत एकाच दिवसात 14 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
औरंगाबादेत यापूर्वी लंडनहून मुंबईमार्गे आलेल्या 50 वर्षीय गृहस्थासह दुबईहून आलेला सिडको, एन-7 येथील 33 वर्षीय तरुण ओमायक्राॅनग्रस्त असल्याचे 25 डिसेंबर रोजी समोर आले. अमेरिकेहून प्रवास करून आलेल्या 24 वर्षीय रुग्णाचा 9 जानेवारी रोजी अहवाल आला आणि तो ओमायक्राॅनबाधित असल्याचे निदान झाले.