पवारांचे ‘हे’ जाहीरनामे राष्ट्रवादीचं भविष्य ठरवणारय

Sharad Pawar Ajit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घड्याळ की तुतारी? शरद पवारांनी अनेक धाडसी निर्णय घेत समाजातील विविध घटकांसाठी केलेल्या कामांकडे बघून तुतारीला मतदान करायचं? की अजित पवारांचा विकास कामांचा सपाटा, कामाची गती आणि दिलेला शब्द पुरा करण्याची धमक बघून घड्याळाला मतदान करायचं? हा मनातला घोळ काही सुटेना. नक्कीच कोणत्या पवारांच्या पाठीशी धावावं? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कार्यकर्ते, स्थानिक नेते आपला कन्फर्ट पाहून हा निर्णय घेत असतात. पण सर्वसामान्य नागरिकांना एकच महत्त्वाचा प्रश्न असतो. तो म्हणजे, आम्हाला काय मिळणार? हे उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला बघावा लागतो तो म्हणजे जाहीरनामा म्हणजेच पक्षाचा मेनीफिस्टो. अजितदादांच्या राष्ट्रवादीचा 4 दिवसांपूर्वी तर लगेच त्यानंतर दोनच दिवसात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानंही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. यात दोन्ही पवारांनी आपल्यासाठी अक्षरशः घोषणांचा पाऊस पाडलाय…घड्याळ आणि तुतारी यांचे भविष्य कसे असेल? हे पक्ष तुमच्या आमच्यासाठी नेमकं काय विजन घेऊन आलेत? सर्वसामान्यांच्या हिताचा सर्वाधिक विचार कुठल्या पवारांकडून जास्त केला जातोय? मतदान नेमकं कुणाला करायचं घड्याळ की तुतारी? याच सगळ्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेऊयात,

महाराष्ट्राचा मंगलकलश ज्यांनी आणला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी करणार. अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील ही घोषणा चांगलीच हायलाईट झाली… त्यासोबत ज्या जातनिहाय जनगणनेला भाजपने खोडा घातलाय तीच जनगणना करण्याची आपण मागणी करणार असल्याचं आश्वासनही अजितदादांनी दिलय. दुसरीकडं शरद पवारांनी महिलांना शासकीय नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण देण्याचं आश्वासन तसेच अग्निवीर योजनांसारख्या शासनाच्या अनेक महत्त्वकांक्षी निर्णयांवर कुऱ्हाड चालवली जाणार असल्याचा शब्द जाहीरनाम्यातून देण्यात आलाय. त्यामुळे मतदानाला जाण्याच्या आधी घड्याळ की तुतारीच्या बाजूने कौल द्यायचा? हे क्लिअर करण्यासाठी या दोन्ही पवारांच्या जाहीरनाम्याचं पोस्टमार्टम आपल्याला करावं लागेल…

सर्वात आधी पाहू अजितदादांच्या राष्ट्रवादीनं जाहीरनाम्यातून नेमका काय शब्द दिलाय तो…

राष्ट्रवादीसाठी राष्ट्र ही संकल्पना घेऊन स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी या टॅगलाईन खाली घड्याळाचा हा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय. यातली सर्वात मोठी घोषणा आहे ती अर्थात यशवंतरावांना भारतरत्न देण्याची… यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची अजित दादांनी मागणी करून मोठा डाव साधलाय. कारण शरद पवारांना बोट धरून राजकारणात आणणारे आणि ज्यांच्या पुरोगामी बेरजेच्या राजकारणाचा वारसा आपण चालवत असल्याचं पवार सांगतात त्याच यशवंतरावांना अजितदादांनी भारतरत्न देण्याची घोषणा केली. राष्ट्रवादीला शरद पवारांचा फोटो वापरायला परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी थेट आपल्या राजकारणाला यशवंतराव चव्हाणांशी कनेक्ट केलं. घड्याळाच्या आधी यशवंतरावांचा फोटो लागू लागला. थोडक्यात आपण यशवंतरावांचे वारसा आहोत, असा अप्रत्यक्ष क्लेमच दादांनी करून शरद पवारांना कोंडीत पकडलं. मागणी जरी जोरदार असली तरी, ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा अनेकदा तापून देखील भाजप सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलंय. आता त्यात अजित दादांच्या या मागणीला भाजप किती सिरीअसली घेतय? हा ही महत्वाचा मुद्दा आहेच…

यासोबतच अजित दादांनी आणखीन दोन मुद्द्यांवर भाजपच्या अगदी विरुद्ध भूमिका घेत कमळापेक्षा घड्याळ कसं वेगळ आहे, यांच्यातील थिन लाईन स्पष्ट केली आहे.. जातनिहाय जनगणना आणि भाजपच्या आक्रमक राष्ट्रवादापेक्षा युद्धाच्या नव्हे तर बुद्धाच्या शांततेला अजित दादांनी प्राधान्य दिलंय. एकीकडे शेजारील देशांच्या दहशतवादाच्या मुद्द्यावर भाजपा आक्रमक होत असताना पवारांनी मात्र मैत्रीपूर्ण संबंध हीच लाईन पुढे घेऊन जाण्यावर भर दिलाय. हे काही महत्त्वाचे हायलाईटर सोडले तर घड्याळाचा उर्वरित जाहीरनामा हा भाजपाला सपोर्टिव्ह असाच असल्याचं दिसून येतं. शासनाच्या योजना फायद्याच्या असून त्यात आणखीन व्हॅल्यू ॲडिशन कसं करता येईल? यावर जास्त भर देण्यात आलाय…

यात मुद्रा योजनेतून मिळणाऱ्या दहा लाखांपर्यंतच्या कर्जाची मर्यादा डबल म्हणजे वीस लाख करणं, महाराष्ट्राला कौशल्य विकासाची राजधानी बनवणं, 70 वर्षंवरील नागरिकांना आयुष्यमान भारत योजना लागू करणं, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं आणि किमान आधार मूल्य म्हणजेच एमएसपीचा मुद्दाही अजितदादांनी घोषणापत्रात जोडून घड्याळाचे काटे कमळाला कसे जोडता येतील? याचा स्पेसिफिक विचार देखील करण्यात आला आहे. या पलीकडे जाऊन काही नव्या मागण्या, योजनाही अमलात आणण्याच्या घोषणा या जाहीरनाम्यातून करण्यात आल्या आहेत. ज्या अमलात आल्या तर त्याचं संपूर्ण क्रेडिट हे अर्थातच अजित दादांना जाणार आहे. यामध्ये उर्दू शाळांना इंग्रजी भाषेचा दर्जा, शहरांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वर्किंग वुमन होस्टेलची स्थापना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर शेत – शिवार – पाणंद या नव्या योजनेसाठी आग्रह आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा बहार करणं याही घोषणा अजितदादांच्या राष्ट्रवादीतून देण्यात आल्या आहेत. थोडक्यात सरकारला समांतर काम करत आपल्या पक्षाचं वेगळेपणही टिकलं पाहिजेल, याकडे अजित दादांनी जास्त भर दिलेला आहे…

आता पाहूयात शरद पवारांच्या तुतारीनं तुम्हा आम्हाला नेमकी काय आश्वासनं दिली आहेत ती… महिला, युवा शेतकरी, कामगार, दुर्बल घटक यांचा विचार करत शरद पवारांनी सगळ्या बाजूंना स्पर्श होईल, असा एकंदरीत विचार करून आपल्या पक्षाचा हा जाहीरनामा तयार केला आहे. बांधीलकी संविधानाप्रती हे ब्रीद घेऊन शरद पवारांची तुतारी शासनाच्या त्यांना वाटणाऱ्या अनेक चुकीच्या योजना आणि निर्णयांना कात्री लावण्यात येणार असल्याचंही जाहीरनामातून क्लिअर होतं. यासोबत पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय संबंध, संघराज्यातील केंद्र राज्य संबंध ते पर्यटन आणि पर्यावरण यांसारख्या मुद्द्यांनाही शरद पवारांची तुतारी स्पर्श करून जाते. तुतारीच्या जाहीरनाम्यातील सर्वात जास्त हायलाईट होणारा निर्णय कोणता असेल तर तो मोदींच्या अनेक निर्णयांना कात्री लावण्याचा…

यात राज्य सरकारच्या अधिकारात जी केंद्राकडून ढवळाढवळ होते ती कमी करण्यासाठी कलम 356 रद्द करणार. स्वयंपाकाच्या गॅसची किंमत 500 रुपये फिक्स ठेवणार. शहरी भागाला परवडेल अशी जीएसटीची रचना करणार, स्मार्ट सिटी योजनेची वस्तुस्थिती श्वेतपत्रिकेद्वारे मांडणार, जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देणार, वन नेशन वन इलेक्शनला विरोध आणि केंद्र सरकारच्या अग्निविर योजना बंद करणार…अशा अनेक मोदी सरकारला अडचणीत आणणाऱ्या घोषणा शरद पवारांच्या तुतारीने केल्यात. एकूणच मोदी सरकारच्या विरोधात महागाई पासून नोकऱ्यांपर्यंत जे काही वातावरण आहे. ते आपल्या बाजूने वळवण्यासाठी शरद पवारांनी संपूर्ण देशावर इम्पॅक्ट पाडणाऱ्या गोष्टींचा जाहीरनाम्यात समावेश केलाय.

यासोबत शेतकऱ्यांच्या अडचणींवर काम करण्यासाठी स्वतंत्र आयोग निर्माण केला जाईल. त्यात सरकारचा राजकीय हस्तक्षेप नसेल. शासकीय क्षेत्रात कंत्राटी कामगारांच्या भरतीला पायबंद घातला जाईल. जातनिहाय जनगणना करण्यासाठी आग्रह धरला जाईल. ५० टक्के आरक्षणाची अट दूर करण्याचा प्रयत्न करू. खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये एससी, एसटी, ओबीसींसाठी आरक्षणाची तरतूद करू. अल्पसंख्याकांसाठी सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचं काम करू. शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य जीएसटी केला जाईल, याची हमी जाहीरनाम्यातून करण्यात आली आहे…

धोरणात्मक पातळ्यांवरही शरद पवारांच्या तुतारीनं अनेक निर्णय घेणार असल्याचं जाहीरनाम्यातून स्पष्ट केलंय. प्रत्येक महापालिकेला एक मेडिकल कॉलेज, शहरांमध्ये केजरीवालांनी राबवले तसे मोहल्ला क्लिनिक, स्वतंत्र जीएसटी कौन्सिलची स्थापना, स्थलांतरित मजूर कामगारांसाठी कल्याणकारी आयोग अशा अनेक घोषणा करत तुतारीनं सर्वसामान्य, कष्टकरी आणि वंचित घटकांना आपल्या बाजूनं कसं वळत करता येईल? याचा पुरेपूर विचार केल्याचा या जाहीरनाम्यातून दिसतं…

थोडक्यात अजित दादा शासनाच्या योजनांना बळ देत भाजपचे हात बळकट करताना दिसतायत. तर दुसरीकडे शरद पवारांनी मणिपूर ते काश्मीरच्या प्रश्नापर्यंत आणि वाढलेली महागाई ते राज्यपालांच्या वाढत्या हस्तक्षेपाला कसं कमी करता येईल, याचं धोरण आपल्या जाहीरनाम्यातून दिलंय. बाकी मराठी भाषेला अभिजात दर्जा, जातनिहाय जनगणना, शेतमालाला हमीभाव, अल्पसंख्यांकांचे हक्क, कंत्राटी कामगारांना योग्य मानधन हे काही समान मुद्दे घड्याळ आणि तुतारी या दोन्ही जाहीरनाम्यात पाहायला मिळतात. हे मात्र विशेष. तरुण, शेतकरी, कामगार, अल्पसंख्यांक आणि मराठा हे घटक दोन्ही पक्षांसाठी किती महत्त्वाचे आहेत? हे यातून क्लियर होतं. या दोन्ही जाहीरनाम्यातील महत्त्वाचा फरक सांगायचा झाला तर, शरद पवारांच्या तुतारीनं जी राष्ट्रीय पातळीवर इम्पॅक्ट पाडण्यासाठी प्रसंगी कायदे बदल करण्याची स्पष्ट भूमिका ही जाहीरनाम्यातून घेतलीय. याउलट अजितदादांच्या घड्याळाचे काटे मोदींचा राजकारणातला गाडा पुढे कसा चालता राहील? याचा विचार करत त्यांच्या धोरणांना सुसंगत अशी भूमिका घेताना जाहीरनाम्यातून दिसते…

महायुतीत गेल्यावर अजितदादांचा घड्याळ हिंदुत्ववादी भूमिका घेणार का? हे कोड अनेकांना पडलेलं असताना अजित दादांनी मात्र आपला जुनाच विचार कायम ठेवलाय. मात्र शरद पवारांनी वंचित, दलित, मुस्लिम आणि शोषित वर्गासाठी आपण कटिबद्ध असल्याचं पुन्हा एकदा दाखवून देत पुरोगामी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कठोर पावलं उचलू, असा आशावादही जाहीरनाम्यातून दाखवलाय…दोन्ही पवारांनी हा घोषणांचा पाऊस पाडला खरा. पण आता यात नक्की कुणाची सत्ता केंद्रात येऊन कुणाला पावसात भिजायची संधी मिळणार, हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल…