बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश करणारे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. सोलापूर येथे आयोजित शिवसैनिकांच्या निर्धार मेळाव्यानंतर सोपल पत्रकारांना ही माहिती दिली . दरम्यान, आपला राजकीय वारसदार हा सोपल कुटुंबातीलच असेल असे नसून तो सामान्य कार्यकर्ताही असू शकतो, असेही सोपल म्हणाले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला . त्यात बार्शीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार दिलीप सोपल, माजी आमदार दिलीप माने, करमाळ्याच्या रश्मी बागल यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांच्या शिवसेना प्रवेशाला अनेक शिवसैनिकांनी विरोध केला होता. यावर आता सोपल यांनी निर्धार मेळाव्यात भाष्य केले .
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून काम करणारे शिवसैनिक हे रसायन वेगळे आहे. शिवसैनिकाला कोण आले आणि कोण गेले याची फिकीर नसते, बाळासाहेब जरी आपल्यातून गेले असले तरी त्यांचा विचार गेलेला नाही. अनेक भाकिते करणारे शेवटी तोंडघसी पडले आहेत, अनेक संकटाना तोंड देत उद्धवसाहेबांनी संघटना मजबूत केली आहे. यंदा ही आपली आठवी निवडणूक असून आजवर प्रत्येक निवडणुकीला चिन्ह बदलत विजयी झालो आहे. चिन्ह बदलल्याशिवाय मी निवडूनच येत नाही, अशी मिश्कील टिप्पणी यावेळी सोपल यांनी केली.