हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीत बंड करून भाजपमध्ये गेल्यानंतर आज पहिल्यांदा मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खासदार शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्य म्हणजे, आज दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी वळसे पाटील शरद पवार यांना भेटले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप या दोन्ही नेत्यांकडून भेटीचे नेमके कारण सांगण्यात आलेले नाही. सध्या शरद पवार आज पुण्यातील मोदी बागेतील निवासस्थानी आहेत. त्यामुळे याठिकाणी त्यांना भेटण्यासाठी लोकांची गर्दी जमली आहे.
दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. सध्या या भेटी संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, वळसे पाटील फक्त दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी शरद पवारांना भेटले असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीवर शरद पवारांनी वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे आजची भेट यासंदर्भात चर्चा करण्यासाठी देखील झाली असल्याचे म्हणले जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर देखील पवार कुटुंब एकत्र दिवाळी साजरी करेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र आता अजित पवार यांना डेंगूची लागण झाल्यामुळे त्यांना पवार कुटुंबासोबत एकत्र दिवाळी साजरी करता येणार नाही. सध्या अजित पवार यांनी फक्त आराम करावा असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत पवार कुटुंबासोबत अजित पवार नसणार आहेत.