सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
उरमोडी हि योजना केवळ खटाव, माण आणि सातारा एवढ्याच भागासाठी असताना ते उरमोडीचे 70 ते 75 टक्के पाणी हे सांगली जिल्ह्याला जात आहे. त्यामुळे आम्हाला पाणीच मिळत नाही. आम्हाला आमच्या हक्काचे पाणी भांडून घ्यावे लागते. या योजनेचे पाणी जर स्वतंत्र बंदिस्त पद्धतीने पाईपलाईनद्वारे काढला. कारण उरमोडी हे महाराष्ट्रातील पहिले असे धरण आहे कि त्याचा स्वतःचा कॅनॉल नाही. त्यामुळे उरमोडीपासून वाठार किरोलीपर्यंत पाइपलाइनने स्वतंत्र कॅनॉल काढावे. तसेच टेंभू योजनेच्या फेरवाटपातील 5 टीएमसी पाणी सातारा, माण खटावला द्यावे, अशी मागणी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव, माण पाणी प्रश्नी आज माजी आमदार दिलीप येळगावकर यांच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी येळगावकर म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील खटाव माण 48 वंचित गावांना टेंभू जलसिंचन योजनेचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यामध्ये खटाव तालुक्यातील 21 गावांसाठी 1.5 टीएमसी तर माण तालुक्यातील 27 गावांसाठी 1 टीएमसी अशी एकूण 2.5 टीएमसी पाण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, खटाव माणच्या वाट्याला कमीत कमी 5 टीएमसी पाणी देणे आवश्यक आहे.
खटावच्या पूर्व भागाला पाणी मिळावे या करीता आपला गेल्या अनेक वर्षांचा संघर्ष आहे. पाणी प्रश्नांबाबत सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आपली मानसिकता आहे. चळवळीचे नेतृत्व कोणीही केले तरी आपली हरकत राहणार नाही. माण खटाव पाणी प्रश्नी आम्ही सर्व विविध पक्षातील नेत्यांनी एकत्रित येऊन लढा देण्याचा निर्णय घेतलेला असे कदम यांनी म्हंटले.