नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासुन राजकीय घडामोडींना वेग आला असुन पक्षांतराचे वारे वाहु लागले आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही येत्या काही दिवसांत राजकीय भुंकप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाणांनी राष्ट्रवादीच्या डॉ.भारती पवारांचा पराभव केला होता. ह्या वेळेसही हरिश्चंद्र चव्हाण यांनी भाजपकडून तयारी सुरु केली असुन राष्ट्रवादीकडुन डॉ.भारती पवार या पुन्हा इच्छुक असतांना पक्षाने दिंडोरीचे माजी आमदार धनराज महालेंना पक्षात प्रवेश दिल्याने पवारांच्या उमेदवारीला पक्षातुनच अडसर झाल्याचे चित्र आहे.
डॉ.भारती पवार या राष्ट्रवादीकडुन इच्छुक असल्या तरी महालेंच्या संभाव्य उमेदवारीने त्यांनी भाजपकडुन उमेदवारी मिळवण्याची तयारी चालवल्याची चर्चा मतदारसंघात असुन येत्या दोन ते तीन दिवसांत डॉ.भारती पवार या भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जातेय. डॉ.भारती पवार यांनी गेल्या पाच वर्षापासुन मतदारसंघात सातत्याने जनसंपर्क ठेवल्याने भाजप मधील काही नेतेच त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. माकपकडूनही कळवण-सुरगाण्याचे आमदार जे.पी.गावित यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला असुन राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत. डॉ.भारती पवार जो निर्णय घेतील त्यासोबत राहुन काम करण्याचा निर्धार पवारांच्या समर्थकांनी व्यक्त केलाय.
दुसरीकडे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे पुन्हा भाजपची उमेदवारी मिळेल या विश्वासाने तयारीला लागले आहेत.मात्र डॉ.भारती पवारांना भाजपने उमेदवारी दिली तर चव्हाण काय निर्णय घेतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.पक्षनिष्ठेच्या बळावर चव्हाणांनाच पुन्हा उमेदवारी भेटेल अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे. दरम्यान येत्या आठ दिवसांत दिंडोरी मतदारसंघातील राजकीय चित्र पालटलेले असेल अशी चर्चा मतदारांमध्ये रंगली असुन डॉ.भारती पवारांचा भाजपमधील प्रवेश निश्चित मानला जात आहे.
हे पण वाचा –
नगरमध्ये राष्ट्रवादीकडून सुजय विखेंना प्रतिस्पर्धी कोण ?
राष्ट्रवादीला मोठा धक्का… ‘यांचा’ भाजप प्रवेश
काँग्रेस प्रवेशाआधी शिवसेना आमदार दर्ग्यात
विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीचे ‘असे’ जागावाटप
राजकारणातील बालहट्ट पुरविताना जाणता राजा चक्रव्युव्हात