व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

महाबळेश्वर अर्बन बॅंकेवर प्रशासक नेमण्याची संचालकांची मागणी

महाबळेश्वर | महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर अर्बन बॅंकेत प्रशासकाही नियुक्ती करण्याची मागणी बँकेचे संचालक समीर सुतार यांनी सहा.दुय्यम निबंधक जे.पी शिंदे यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी जेष्ठ संचालक युसूफ शेख, संगीत तोडकर, दिलीप रिंगे, वृषाली डोईफोडे उपस्थित होत्या. महाबळेश्वर अर्बन बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या निवडी आधी सर्व संचालकांची बंद दाराआड चर्चा फिस्कटली व संचालकांमध्ये मतभेद झाल्याने निवडीवेळी संचालक समिर सुतार यांच्यासह जेष्ठ संचालक युसूफ शेख, संगीता तोडकर, वृषाली डोईफोडे, दिलीप रिंगे हे अनुपस्थित राहिले. या बहिष्कारामुळे 13 संचालकांपैकी 8 संचालकांच्या उपस्थितीत ही निवडीची प्रक्रिया पार पडली.

या निवडीवेळी अनुपस्थित राहिलेल्या पाच संचालकांच्या गटाने सहा. दुय्यम निबंधकांना भेटून निवेदन दिले असून या निवेदनात बँकेतील पदाधिकारी निवड रद्द करून प्रशासकाची नियुक्ती करण्याची प्रामुख्याने मागणी केली आहे. तसेच बँकेच माजी अध्यक्षांचा निष्क्रिय कारभारामुळेच आम्ही संचालकांनी त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले तसेच सर्वांनी एकत्रित येऊन बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करून थकबाकीची प्रमाण कमी करण्यासाठीचे महत्वपूर्ण काम करणे गरजेचे होते. मात्र बँकेच्या सभासदांनी ज्या विश्वासाने संचालकांना विश्वस्त म्हणून पाठवले आहे त्यांनाच धोका देऊन नूतन अध्यक्षांसह काही संचालकांनी नातेवाईक मित्रमंडळींच्या नावावर घेतलेल्या भरमसाट कर्जाची परतफेड करायची नाही, हेच धोरण या संचालकांचे असून यांनीच बँकेस आर्थिक अडचणीत आणले आहे. बँकेतच गटतट निर्माण करून राजकारण करण्याचा प्रयन्त सुरु केले असून असे गट निर्माण करून या गटांच्या माध्यमातून आपला स्वार्थ व उन्नती साधत आहेत. अश्या प्रकारचे वर्तन चालू असल्याने संस्थेच्या व भागधारक, ठेवीदारांच्या हिताचे नसल्याने अश्या संचालकांवर कारवाई करावी व बँकेवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

यावेळी अर्बन बँकेचे संचालक समीर सुतार यांनी महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या बँकेत कधीही, कोणत्याही प्रकारचे राजकारण झाले नाही, गटातटाचे राजकारण न करता संस्था प्रगतिप्रथावर जावी यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो मात्र आता या परंपरेला छेद देण्याचे काम नूतन अध्यक्षांसह काही संचालकांकडून होत असून या निवडीला आमचा विरोध असल्याचे नमूद केले. यावेळी जेष्ठ संचालक युसूफ शेख, संगीता तोडकर, वृषाली डोईफोडे, दिलीप रिंगे उपस्थित होते. या पाच संचालकांनी दिलेल्या तक्रारीला दुय्यम निबंधक काय निर्णय घेतात याकडे महाबळेश्वर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.