हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी एक विधान केले होते. त्यावरून आता राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण यासंदर्भात दिशा सालियानच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आता मालवणी पोलिसांनी त्यांना समन्स बजावलंले आहे.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर त्याच्या या विधानाची गंभीर दखल राज्य महिला आयोगाकडून घेण्यात आली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी मालवण पोलिसांना पत्र पाठवून या प्रकरणी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले होते.
त्यानंतर मालवणी पोलिसांनी नारायण राणेंना समन्स बजावले आहेत. ३ मार्च रोजी अर्थात गुरुवारी नारायण राणेंना मालवणी पोलिसांसमोर हजर राहाण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नारायण राणेंनी केलेल्या दाव्यांबाबत त्यांचा जबाब यावेळी नोंदवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ४ मार्च रोजी नितेश राणे यांना मालवणी पोलिसांसमोर हजर राहाण्यास सांगण्यात आले आहे.