जि. प. माजी सभापतींकडून अधिकार्‍यास शिविगाळ, अदखलपात्र गुन्हा दाखल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्यावर सोमवारी झालेल्या राड्यानंतर आता मंगळवारी पुन्हा माजी पदाधिकारी आणि अधिकार्‍यामध्ये राडा झाला. माजी सभापती तमनगौडा रवि-पाटील यांनी ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली. याबाबतचा विश्रामबाग पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान कर्मचारी संघटनांनी काम बंद आंदोलन करून मुख्याल्यासमोर निदर्शने केली. रवि-पाटील यांना अटक करा अन्यथा बुधवारी काळ्या फिती बांधून काम करण्याचा इशारा देण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाचा कार्यकाळ अंतिम टप्प्यात आहे, जिल्हा परिषदेची ऑनलाइन पद्धतीने सर्वसाधारण सभा होणार होती, मात्र ही सभा ऑनलाइन पद्धतीने न घेता, ऑफलाइन घेण्याची काही सदस्यांची मागणी होती, या वादातूनच सोमवारी रात्री उशिरा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर सदस्य व अध्यक्षांचे पती आणि दीर यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली होती. हा वाद शांत होतो न होतो, तोपर्यंत जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि भाजपचे पक्षप्रतोद रवि-पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लोखंडे यांच्यात मोबाईलवरुन जोरदार वादावादी झाली. या वादाचे रुपांतर शिवीगाळपर्यंत गेले.

माजी सभापती रवि-पाटील यांनी शिवीगाळ केली असल्याची तक्रार उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लोखंडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात केली असून याबाबतचा अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनांनी काम बंद आंदोलन करून मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. माजी सभापती रवि-पाटील यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली. बुधवारी काळ्या फिती बांधून काम करण्यात येणार आहे, त्यानंतरही अटक न झाल्यास काम बंदचा इशारा अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी दिला आहे.