अहमदनगर । कोरोना महामारीचे संकट सुरू झाल्यापासून सर्वच सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. दिवाळी मात्र ‘धुमधडाक्यात’ साजरी करण्यास करता येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. दिवाळीच्या काळात फटाके विक्रीसाठी तात्पुरते परवाने देण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याच्या मागणीकडेही दुर्लक्ष करण्यात आले असून अर्जाची पद्धत नेहमीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे.
नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधी आवाहन करून फटाके विक्रीचे तात्पुरते परवाने घेऊ इच्छीणाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ३१ ऑक्टोबरपर्यंत ठिकठिकाणच्या तहसिलदार कार्यालयात नेहमीच्या पद्धतीने आणि नेहमीची कागदपत्रे जोडून अर्ज करायचे आहेत. अर्ज तहसिलदार कार्यालयातच करायचे असून तेथूनच परवाने मिळणार आहेत. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे. तोपर्यंत करोनाचे संकट कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
यापूर्वीच सरकारमधील अनेक मंत्र्यांनीही नोव्हेंबरपर्यंत करोना संपेल, अशी विधाने केलेली आहेत. सध्या राज्यातील अनेक ठिकाणी दिलासादायक परिस्थिती दिसून येत आहे. नव्या बाधितांचे आकडे काहीसे कमी होत आहेत. मात्र, बऱ्याच ठिकाणी अद्यापही परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे नवरात्राचे उत्सवही रद्द करण्याची वेळ आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.