कोरोना काळातील लैंगिक अत्याचारातील आरोपींना जामीन देऊ नका! चित्रा वाघ यांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कोरोना काळातील लैंगिक अत्याचारातील आरोपींना जामीन दिला जाऊ नये, त्यांचे जामीन रद्द करावे यासाठी राज्य शासन व पोलिसांनी न्यायालयाला विनंती करावी अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज कराड येथील पत्रकार परिषदेत केली. महाविकास आघाडी सरकार महिलांवरील अत्याचाराबाबत गंभीर नाही महिला सुरक्षेबाबत सरकार पुर्णपणे अपयशी ठरले असल्याची टिका चित्रा वाघ यांनी यावेळी केली. याशिवाय लैंगिक अत्याचारातील आरोपींना कुठल्या अटी- शर्थींवर जामीन मिळत आहे याचीही शहानिशा करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी यावेळी केली.

छोट्या-छोट्या गोष्टीसाठी व्यक्त होणारे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यासाठी महिला सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा नाहीये का अशी विचारणा करत आम्ही दिशा कायद्याची वाट पाहत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. राज्य सरकार महिला सुरक्षेबाबत नवा कायदा आणू म्हणते, पण त्याचं प्रारूप काय असणार याबाबत स्पष्टता नसल्याचेही वाघ यांनी म्हटलं.

सरकार कोरोना काळाचं कारण देत दिशा कायदा आणत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. कोरोना काळात इतर शासन निर्णय होत असतांना महिला सुरक्षेबाबतचा शासन निर्णय सरकार का घेत नाही अशी विचारणा चित्रा वाघ यांनी केली. सरकार कोणाचेही असो महिला सुरक्षेचा प्रश्न हा राजकारणाचा विषय नाही आहे. त्यामुळं आम्ही जोपर्यंत महिला अत्याचाराच्या घटना घडत राहतील तोपर्यंत त्या घटना सरकारसमोर आणण्याचा आम्ही प्रयन्त करणार असल्याचंही चित्रा वाघ यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी CBI ने तपास करावा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. यावर चित्रा वाघ यांना प्रश्न केला असता त्यांनी केवळ सत्यमेव जयते असे उत्तर दिले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”