ओमिक्रॉन झाल्यास काय करावे ?; डॉ. भोंडवेंनी दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक, गुजरातपाठोपाठ डोंबिवलीत ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रात भीतीचे वातावरण पसरले आहे. आता तर दिल्लीतही ओमिक्रोनचा रुग्ण सापडल्याने केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. या वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रोनबाबत लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. याबाबत पुण्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. “ओमिक्रोन झाल्यास हात धुणे, सोशल डिस्टन्स पाळणे आणि मास्क वापरणे या गोष्टी केल्याच पाहिजे. तरच ओमिक्रॉनला रोखता येणे शक्य आहे. तसेच गर्दीत जाणे टाळले पाहिजे आणि लस घेतली पाहिजे, त्याशिवाय मानसिक आरोग्य चांगले ठेवावे, असा सल्ला भोंडवे यांनी दिला आहे.

डॉ. अविनाश भोंडवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओमिक्रोनबाबत काळजी घेण्याबाबत काय उपाय करावे याविषयी सल्ला दिला. ते म्हणाले की, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा लोकांनाच या आजाराचा अधिक धोका आहे. डेल्टा विषाणूपेक्षा ओमिक्रॉन पाचपट वेगाने अधिक पसरतो. त्याचा पसरण्याचा वेग अधिक असला तरी या आजाराची लक्षणे गंभीर नाहीत. लहान मुलांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका आहे. 2 ते 18 या वयोगटातील ज्यांचे लसीकरण झाले नाही. त्यांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे लस घेणे महत्त्वाचे असून काळजी घ्यावी.

ओमिक्रॉन रोखण्यासाठी प्रशासनाने टेस्टिंग वाढवली आहे. परदेशातून येणारे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. ही संख्या अधिक आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लांट आणि हॉस्पिटलं तयार ठेवली पाहिजेत, अशी सूचना केल्याची माहितीही यावेळी डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.