जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (वय 74) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. एक वर्षापूर्वी त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते. तेव्हापासून पिंपरी- चिंचवडच्या राहत्या घरी सून आणि मुलगा त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. परंतु, गेल्या 15 दिवसांपूर्वी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तात्काळ पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत आज मालवली.

नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म 29 मार्च 1948 या दिवशी जिल्हा नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला. शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आणि बीए मराठीचे शिक्षण देगलूर महाविद्यालय येथे पूर्ण केले. त्यात ते मराठवाड्यात तिसरे तर मराठी विषयात पहिले आले. त्यांनी 1980 मध्ये मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथुन डॉ.यु.म.पठाण सरांच्या मार्गदर्शनाने ‘शंकरराव पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर पीएच. डी.चे संशोधन केले, पदवी मिळवली.

नागनाथ कोतापल्ले हे 1977 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले. 2005 पासून 2010 पर्यंत कोतापल्ले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते. नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे कामही त्यांनी केले आहे.

नागनाथ कोतापल्ले हे 1988 ते 1995 या काळात मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, 1995 ते 1996 मध्ये साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे समन्वय संपादक होते. तसेच ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाचे संपादक म्हणुनही त्यांनी काम केले आहे. कराडजवळ उंडाळे येथील साहित्य संमेलन, पुण्यातील पहिले औंध उपनगरीय मराठी साहित्य संमेलन (2003) राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन इत्यादी संमेलनांची अध्यक्षपदे नागनाथ कोतापल्ले यांनी भूषविली आहेत. याशिवाय, ते 2012 मध्ये चिपळूण येथील 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते.

असे मिळालेत पुरस्कार :

1) पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार
2) ‘ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध’साठी परिमल पुरस्कार (1985)
3) ‘ज्योतिपर्व साठी केशवराव विचारे पारितोषिक (2002)
4) दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार (2018)
5) यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (2001)
6) ‘राख आणि पाऊस’साठी बी. रघुनाथ पुरस्कार (1995)
7)  ‘राख आणि पाऊस’साठी महात्मा फुले पुरस्कार (1995)
8) ‘साहित्य अवकाश’साठी शिरीष गांधी साहित्य पुरस्कार

लिहलेली कादंबरी व कथासंग्रह :

  1. कर्फ्यू आणि इतर कथा
  2. कवीची गोष्ट गांधारीचे डोळे
  3. देवाचे डोळे
  4. पराभव
  5. मध्यरात्र
  6. रक्त आणि पाऊस
  7. राजधानी
  8. संदर्भ
  9. सावित्रीचा निर्णय
  10. उद्याच्या सुंदर दिवसांसाठी