Wednesday, June 7, 2023

Drugs Case : आर्यन खानला नाही मिळाला जामीन, आता ‘या’ याचिकेवर बुधवारी होणार सुनावणी

मुंबई । क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेला बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या वकिलांनी पुन्हा एकदा सत्र न्यायालयात त्याची जामीन याचिका दाखल केली आहे. यावर, न्यायालयाने सोमवारी या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख 13 ऑक्टोबर निश्चित केली आहे. आर्यन खानच्या जामिनावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे. यापूर्वी महानगर दंडाधिकारी न्यायालयात आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने या प्रकरणी न्यायालयाकडे एक आठवड्याची मुदत मागितली होती. मात्र, न्यायालयाने NCB ला बुधवारपर्यंतची मुदत दिली आहे. या प्रकरणात NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे म्हणतात,”आम्ही आणि फिर्यादी खटला तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. आमचे प्रकरण मजबूत आहे आणि आम्ही ते न्यायालयात सादर करू.”

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर शुक्रवारी आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आले. आर्यनसह, या प्रकरणात अटक केलेल्या इतर पाच आरोपींनाही आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आले. मुनमुन धामेचासह दोन महिला आरोपींना भायखळा महिला कारागृहात पाठवण्यात आले आहे. या लोकांना कारागृहात कोणतीही विशेष सुविधा मिळणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

शुक्रवारी झालेल्या सुनावणीत अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर.एम. नेर्लीकर यांनी आर्यन, मुनमुन धामेचर आणि अरबाज मर्चंट यांच्या जामीन याचिका कायम ठेवण्यायोग्य नसल्याचे म्हटले होते. NCB ने गोवा जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर तिघांना इतरांसह अटक करण्यात आली.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी NCB कडे हजर राहून तिन्ही आरोपींच्या जामीन अर्जांना विरोध केला. यापूर्वीच्या अनेक आदेशांचा संदर्भ देत त्यांनी युक्तिवाद केला होता की, या याचिकांवर सुनावणी घेणे हे दंडाधिकाऱ्यांचे अधिकार क्षेत्र नाही आणि NDPS कायद्यांतर्गत सर्व प्रकरणांची सुनावणी विशेष न्यायालयाने करावी.

सिंग यांनी असाही युक्तिवाद केला होता की, सर्व आरोपी एकाच ठिकाणी सापडले हा योगायोग असू शकत नाही. त्यांनी आरोप केला की, हि लोकं नियमितपणे ड्रग्ज घेतात.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरलने न्यायालयाला सांगितले होते की,’ आर्यनचे कुटुंब प्रभावी आहे आणि जर त्याची जामिनावर सुटका झाली तर तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो.’ सिंह यांनी दावा केला होता की, आर्यन आणि सहआरोपी अचित कुमार यांच्यात झालेले Whats App वरील संभाषण फुटबॉलबद्दल नाही तर मोठ्या प्रमाणाबाबत होते.’ आर्यनचे वकील सतीश मानशिंदे यांनी दावा केला होता की,’ हे संभाषण फुटबॉलबद्दल आहे.’

वकील मानशिंदे यांनी शुक्रवारी युक्तिवाद केला होता की,”जामीन याचिकेवर निर्णय देण्याचा अधिकार दंडाधिकारी न्यायालयाला आहे आणि त्याची भूमिका केवळ आरोपींना कोठडीत पाठवण्यापुरती मर्यादित नाही.” ते म्हणाले होते की,” जर या न्यायालयाला माझ्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत तर मला सोडून देण्याचा अधिकार आहे.”

वकिलाने दावा केला होता की,’NCB ला आर्यनविरोधात कोणतेही षड्यंत्र सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे सापडले नाहीत.’ ते म्हणाले होते की,” विशेष सामाजिक दर्जा असलेल्या आरोपीसाठी तुरुंगात असणे अपमानास्पद असू शकते.’ ते म्हणाले होते, ‘कारण माझे कुटुंब प्रभावशाली आहे, केवळ याच आधारावर असे म्हणता येणार नाही की मी पुराव्यांशी छेडछाड करेन.’

युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने केवळ जामीन अर्ज फेटाळला की, ती कायम ठेवण्यायोग्य नाही. गेल्या शनिवारी रात्री मुंबई किनाऱ्यावर गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर या तिघांना काही इतरांसह NCB ने ताब्यात घेतले. या आरोपींकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचा केंद्रीय एजन्सीचा दावा आहे. या प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे.