कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
देशातील कोट्यवधी सामान्य जनतेवर गंभीर परिणाम करणारा निर्णय ‘अनावधानाने किंवा नजरचुकीने’ कसा काय होऊ शकतो? किंवा पाच राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेता केंद्राने हा निर्णय रद्द केला किंवा “तात्पुरता” स्थगीत ठेवला आहे? अर्थातच देशाच्या नाजूक आर्थिक परिस्थितीत वित्तमंत्र्यांचा हा कटू आर्थिक निर्णय राजकीय पातळीवर किंवा पंतप्रधानाच्या स्तरावर तातडीने बदलला गेला हे स्पष्ट आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
काल रात्री उशिरा केंद्रीय वित्त मंत्रालयाने एक परिपत्रक काढून १ एप्रिल २०२१ पासून पहिल्या तिमाही करिता सर्व अल्प बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) चे व्याजदर, पोस्टाच्या बचत खात्यांवरील व्याजदर तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवी व राष्ट्रीय अल्पबचत प्रमाणपत्र, किसान विकासपत्र आणि सुकन्या समृद्धी योजना या सर्व अल्प बचत योजनांचे व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले होते. पण अचानक आज सकाळी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका ट्विट संदेशाद्वारे कालचा हा निर्णय “अनावधानाने” घेतला गेल्याचे सांगितले व निर्णय रद्द केला व व्याजदर पूर्ववत केले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राजीव गांधी पंतप्रधान असताना १९८६ साली पीपीएफचा व्याजदर ९.५०% वरून एकदम १२% वर नेण्यात आला होता. तो दर २००० सालापर्यंत कायम होता. त्यानंतर पुढील केंद्र सरकारांनी व्याजदरामध्ये कपात केली होती. २०१३ साली युपीए सरकारच्या काळात पीपीएफ वर ८.८% व्याज मिळत होते. मोदी सरकारच्या कालावधीत हळूहळू कमी होत १ एप्रिल २०२० ला ७.१% वर आला होता. कालच्या निर्णयामुळे तो ६.४% होणार होता. म्हणजेच ०.७% किंवा व्याजाच्या उत्पन्नात १०% कपात करणारा होता.
एका बाजूला पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल यांच्या किमती भडकल्या आहेत. दोन दिवसापूर्वीच मुडीज या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेने भारतातील महागाईचा दर “uncomfortably high” म्हणजे न सहन होण्याइतका आहे असा इशारा दिला होता. कोरोना महामारीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेले २१ लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेजदेखील फसवे होते हे जनतेच्या कळून चुकले आहे. मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्थाच उद्ध्वस्त झाली आहे. ५ ट्रीलियन डॉलर्स अर्थव्यवस्था शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू अश्या पोकळ आश्वासने यामुळे संपूर्ण वित्त मंत्रालयच “नजरचुकीवर” चालले आहे की काय अशी शंका घेण्यास पुरेपूर वाव असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group