कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराडच्या कृष्णा नाक्यावरील सिंदल हॉस्पिटल समोरील चौकात डंपरखाली सापडून महिला जागीच ठार झाली. सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मनीषा संजय पाटोळे (वय ४७, रा. बनवडी फाटा, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, अपघातानंतर डंपर चालक पसार झाला आहे. बनवडी फाटा येथे राहणाऱ्या मनीषा पाटोळे यांचा मुलगा सौमित्र हा बारावीला असून सध्या त्याची परीक्षा सुरू आहे. मंगळवारी त्याचा पेपर आहे. मात्र तो आजारी असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हाती मिळालेल्या माहितीनुसार आजारी मुलाचे जेवण घेऊन मनीषा पाटोळे रुग्णालयात निघाल्या होत्या. कृष्णा नाक्यावरील सिंदल हॉस्पिटलसमोरच्या चौकात डंपरने वळण घेतानाच मनिषा पाटोळे यांच्या गाडीला धक्का दिला. या धक्क्यामुळे दुचाकीवरून पडून मनीषा पाटोळे डंपरच्या पुढील चाकाखाली आल्या.महिला चाकाखाली आल्याचे डंपर चालकाच्या लक्षात आल नाही. त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या.
डंपरची महिलेला धडक बसल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मनीषा पाटोळे यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूनंतर त्या राहत असणाऱ्या परिसरातून हळहळ व्यक्त होत असून आजारी असलेल्या सौमित्रला तीव्र मानसिक धक्का बसला आहे.