कराड | ऊसाच्या फडात पाचोळ्याला आग लागल्यामुळे झोळीत झोपवलेल्या अकरा महिन्याच्या मुलीचा भाजुन दुर्दैवी मृत्यू झाला. बनवडी (ता. कराड) येथे ही घटना घडली. नंदिनी सोमय्या वरवी (रा. निलपाणी, ता. चोपडा, जि. जळगाव) असे भाजून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील एका साखर कारखान्याची ऊसतोड मजुरांची टोळी बनवडी गावात दाखल झाली आहे. या मजुरांच्या टोळीकडून परिसरातील ऊसाची तोड करण्यात येत असून मंगळवारी गावातील एका शेतकऱ्याच्या ऊसाची तोडणी करण्यासाठी मजूर गेले होते. या मजुरांपैकी सोमय्या वरवी यांना अकरा महिन्याची नंदिनी नावाची मुलगी होती. सोमय्या यांच्या पत्नीने ऊसतोडणी सुरू असताना नंदिनीला झोपवले. तिला झोळीमध्ये बांधून ठेऊन ती फडात गेली. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सर्व मजूर ऊस तोडणीमध्ये व्यस्त असताना अचानक नंदिनीला ज्याठिकाणी झोळीत ठेवले होते. तेथील पाचोळ्याला आग लागल्याचे मजुरांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याठिकाणी धाव घेऊन पाचोळा विझविला. मात्र, पाचोळ्याला लागलेल्या या आगीत अकरा महिन्यांची नंदिनी भाजून गंभीर जखमी झाली.
मजुरांनी तिला तातडीने कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कराड शहर पोलिसांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला. तसेच उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अकरा महिन्यांच्या मुलीचा भाजुन दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. याबाबतची नोंद कराड शहर पोलिसात झाली आहे. हवालदार देशमुख तपास करीत आहेत.