हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आनंदाने काम केलं तर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात आम्ही नाईलाजाने काम केलं असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीमध्ये ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी विविध राजकीय विषयांवर थेट भाष्य केलं.
अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली मी काम केलं. खरं तर या दोघांनाही आमदारकीचा सुदधा अनुभव नव्हता. पृथ्वीराजबाबा हे सुरुवातीपासूनच दिल्लीच्या राजकारणात होते, त्यांची जडणघडण केंद्राच्या राजकारणात राहिली. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून सुद्धा काम पाहिले होते. दुसरीकडे उद्धव ठाकरे सुद्धा कधी आमदारही नव्हते. परंतु सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. आणि उद्धव ठाकरेंच्या काळात आम्ही सर्वानी एकत्रपणे आणि आपलेपणाने काम केलं.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत आम्ही ४ वर्ष काम केलं, कधी कधी आपल्याला समाधानाने काम करावं लागत, तर कधी कधी नाईलाजास्तव काम करावं लागत. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये आम्ही आनंदाने आणि समाधानाने काम केलं तर पृथ्वीराज बाबांच्या वेळेस वरिष्ठानी सांगितल्यामुळे नाईलाजास्तव काम करावं लागलं असं अजित पवार यांनी म्हंटल. अजितदादांच्या या विधानांनंतर काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते हे आता पाहावं लागेल.