पुणे | श्रीगणपती हा केवळ विविध कलांची देवता नसून सर्जनशीलता निर्माण करणारी शक्ती आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) मधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी त्यांच्या एकूण ८० कलाकृतींमधून हे सिद्ध केले आहे! श्रीगणेशाच्या विविधढंगी मूर्तींचे हे आगळे वेगळे प्रदर्शन कर्वेनगर परिसरात बीएनसीएच्या तळ मजल्यावरील स्क्केअर कोर्ट येथे ठेवण्यात आले आहे. या सर्जनशील उपक्रमाची संकल्पना प्रा.कविता मुरुगकर, प्रा. सायली अंधारे आणि सहकारी प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली ती राबवण्यात आली.
बीएनसीएने प्रथमच श्रीगणरायाच्या विविध रूपांवर आधारित हे प्रदर्शन आयोजित केले आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या भाजा, फळे, कम्प्युटरचे साहित्य, सीडी-डीव्हीडी, सुतळ्या. कागद, आकाशकंदील आणि कापड यासारख्या पर्यावरणपूरक व सेंद्रीय साहित्याचा वापर करून एकंदर ८० विविध आकारातील गणपतीच्या सर्वांग सुंदर मूर्ती घडवल्या.
शाडूच्या मातीशिवाय अन्य माध्यमातून या विद्यार्थिनीपुढे श्रीगणेश साकारण्याचे मोठे आव्हान होते व ते त्यांनी यशस्वीरित्या पेलले, याचा आनंद बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, गणपती ही केवळ बुद्धीची देवता नसून कल्पकता निर्माण करणारी प्रेरक शक्ती आहे. वास्तूरचनाशास्त्राच्या पहिल्या वर्षात आलेल्या या ८० विद्यार्थिनींनी त्यांच्यातली कल्पकता आणि सृजनशीलता या गणेशाच्या आकारांमधून अत्यंत कलात्मक पद्धतीने साकार केली आहे. त्या सार्या जणींचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.