मुंबई । सोयाबीनसह सर्वच खाद्यतेलाच्या किमतींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठी वाढ झाली आहे. त्यात प्रामुख्याने सोयाबीन, सूर्यफूल, सरकी, पामतेलाचा समावेश आहे. अतिवृष्टी आणि पावसामुळे तेलबियांच्या उत्पादनाला फटका बसलाय. तसंच आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आल्यानं खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे गृहिणींचं महिन्याचं बजेट कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. (Rising edible oil prices hit ordinary citizens)
बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत झालेली वाढ पुढील 2 ते 3 महिने कायम राहण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून स्वयंपाकासाठी पामतेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचबरोबर अन्नप्रक्रिया उद्योगातही पामतेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र पामतेलाची किंमत जवळपास 120 हून अधिक झाल्यानं सामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
दुसरीकडे सोयाबीन तेलाचा दर 135 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचला आहे. अवघ्या दोन महिन्यात सोयाबिनच्या दरात 35 रुपयांनी वाढ झाली आहे. सूर्यफुलाच्या तेलाची किंमत 145 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचली आहे. यंदा देशात सोयाबीन आणि कच्च्या तेलाची आयात 70 टक्क्यांवर गेलीय. केंद्र सरकारनं आयात खर्च वाढवल्यानं देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
खाद्यतेलाच्या किमती का वाढत आहेत?
भारतात सर्वसाधारणपणे 70 टक्के खाद्यतेल हे परदेशातून आयात केलं जातं. तर 30 टक्के भारतात तयार होतं. यंदा कोरोना संकटामुळं अन्य देशांमधून होणारी खाद्यतेलाची आयात ठप्प झाली होती. त्यातच केंद्र सरकारनं पामतेलावरील आयात शुल्क वाढवलं आहे. त्याचा परिणाम खाद्यतेलांच्या किंमतीवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळं सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झाल्यामुळे उत्पन्नात घट झाली. त्याचा परिणामही खाद्यतेलाच्या निर्मितीवर झाला आहे.
किरकोळ बाजारातील तेलाचे दर (प्रति किलो)
१)सोयाबीन तेल – १३५ रुपये
२)सरकी तेल – 115 रुपये
३)सूर्यफूल तेल – 145 रुपये
४)पामतेल – 121 रुपये
५)शेंगदाणा तेल – 160 रुपये
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’