Tuesday, January 31, 2023

साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त; अजित पवारांच्या अडचणी वाढणार??

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना ईडी ने जप्त केला आहे. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या निकटवर्तीयांचा आहे. तसेच अजित पवार यांच्याशी संबंधित स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा या व्यवहारातील सहभाग पाहाता संशयाची सूई खुद्द अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचं आता बोललं जात आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित 25 हजार कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याचसंदर्भात ईडीने ही कारवाई केली आहे.

- Advertisement -

अजित पवारांचा संबंध कसा ??

2010 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने या कारखान्याचा लिलाव करुन गुरु कमॉडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला विकला होता. ईडीनं दिलेल्या माहितीनुसीर, गुरू कमॉडिटीजनं हा कारखाना लागलीच जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला लीजवर दिला. या कंपनीमध्ये स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे बहुतांश शेअर आहेत. स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचं ईडीचं म्हणणं आहे.

अजित पवार काय म्हणतात –

जरंडेश्वर कारखान्याची विक्री ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झाली होती, त्यामध्ये कारखान्यातील संचालक मंडळाचा कोणताही हात नव्हता असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.