हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईडीच्यावतीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना नुकतेच समन्स बजावण्यात आलेले आहे. 2015 मध्ये तपास यंत्रणेने बंद केलेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणावर ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावल्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
ईडीच्यावतीने सध्या अनेक राजकीय नेत्यांना टार्गेट केले जात आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यावरही ईडीने कारवाई केलेली आहे. दरम्यान आता ईडीच्यावतीने थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांना समन्स बजावण्यात आले आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरण 2015 मध्ये तपास यंत्रणेने बंद केला होता. या प्रकरणावर आता पुन्हा ईडीच्यावतीने चौकशी केली जात असून त्या अंतर्गत सोनिया गांधी व राहुल गांधी यांना समन्स बजावण्यात आले आहे. दोघांनाही 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीच्यावतीने नोटिसीद्वारे देण्यात आलेले आहेत.
Enforcement Directorate summons Congress interim president Sonia Gandhi and party MP Rahul Gandhi over the National Herald case, which was closed by the investigating agency in 2015: Official Sources pic.twitter.com/RKqVNpEDXE
— ANI (@ANI) June 1, 2022
नेमकं काय आहे प्रकरण?
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांना ईडीच्यावतीने ज्या प्रकरणात समन्स बजावण्यात आलेले आहे ते नेमकं प्रकरण काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर ते प्रकरण आहे, नॅशनल हेराल्ड प्रकरणात 55 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. 2012 मध्ये स्वामी यांनी एक याचिका दाखल करून काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे आरोप केले होते.
2008 मध्ये एजेएलची सर्व प्रकाशने बंद करण्यात आली होती. तसेच या एजेएल कंपनीवर 90 कोटींचे कर्जही झाले होते. त्यानंतर काँग्रेसने यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक नवी अव्यवसायिक कंपनी बनवली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासहीत मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रौदा आदी नेते या कंपनीत संचालक होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे या कंपनीचे 76 टक्के शेअर होते. तर इतरांकडे 24 टक्के शेअर होते. काँग्रेस पक्षाने या कंपनीला 90 कोटींच कर्जही दिले होते.