Thursday, October 6, 2022

Buy now

पेट्रोल- डिझेल संपल्याने शिवशाहीचा बसेस खोळंबा : प्रवाशांचे हाल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जिल्हा पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने एक दिवस देशव्यापी पेट्रोल- डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला होता. पेट्रोल पंप चालकांच्या फामपेडा संघटनेने केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात 31 मे रोजी ‘नो परचेस डे’ आंदोलन केले. या आंदोलनाचा फटका आज 1 जून रोजी वाहनचालकांना तसेच एसटी महामंडळाला बसला. महामार्गावर अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल- डिझेल नसल्याने एसटी बससह अनेक वाहने उभी दिसून आली. परंतु बसमधील डिझेल संपल्याने प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

डिझेल नसल्याने मुंबईला जाणार्‍या प्रवाशांचे शिवशाहीत हाल झालेले पहायला मिळत आहेत. तिकीट काढूनही तासन्- तास महामार्गावर एस.टी बसेस खोळंबल्या स्थितीत उभ्या आहेत. खंडाळा येथे डिझेल संपल्याने शिवशाही बसेस महामार्गालगत उभ्या केलेल्या असून प्रवाशी वैतगलेले आहेत. त्यामुळे प्रवासाला जाणाऱ्या प्रवाश्यांचे मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन हाल होत आहेत.

केंद्र सरकारने इंधनामध्ये दरकपात केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, इंधनावरील कमिशन न वाढवणे व दरकपातीविरोधात पेट्रोल पंप चालकांची संघटना फामपेडा आक्रमक झाली आहे. या धोरणाच्या विरोधात संघटनेच्यावतीने 31 मे रोजी ‘नो परचेस डे’ आंदोलन करण्यात आले. त्यामुळे आज दि. 1 जून रोजी पेट्रोल व डिझेलची टंचाई जाणवू लागली आहे.

पेट्रोल- डिझेलचे दर 75 टक्क्यांनी वाढले

डिझेल मागे प्रतिलिटर साडेतीन रुपयांनी, पेट्रोल मागे प्रतिलिटर सव्वातीन रुपये कमिशन दिले जाते. हे कमिशन वाढलेल्या दरांच्या तुलनेत परवडत नाही. सध्या पेट्रोल व डिझेलचे दर 75 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे कंपन्यांकडून माल खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागतात. वित्त पुरवठा करणाऱ्या बँकांना जास्त व्याज द्यावे लागत असून महागाईमुळे खर्च वाढला आहे. या विरोधात आंदोलन करण्यात आले होते.