मुंबई । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईत दाखल झाले असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बातमी समोर आली होती. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चर्चाही झाल्याचं म्हटलं जात होता. हा बडा नेता म्हणजे एकनाथ खडसेच असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच आज एकनाथ खडसे आणि शरद पवार यांची भेट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आज एकनाथ खडसे आणि शरद पवार यांची भेट होणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, ही भेट कधी होणार यासाठी वेळ निश्चित झाली नसली तरी ही भेट होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार आपल्या दैनंदिन कामकाजासाठी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले आहेत. एकनाथ खडसे सध्या त्यांच्या चर्चगेट इथल्या निवासस्थानी आहेत. यासंदर्भात एकनाथ खडसे यांच्याकडे विचारणा केली असता, मी एकनाथ खडसे आहे, लपूनछपून कोणत्याही गोष्टी करत नाही असं बोलून प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. परंतु भेट होणार नाही, अशी शक्यताही नाकारली नाही.
शरद पवार यांच्या नेतृत्त्वात जळगावमधील स्थानिक नेत्यांची काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. त्यात खडसेंच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाणार होता. परंतु राष्ट्रवादीने यासंदर्भात अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे आज जर दोन्ही नेत्यांची भेट झाली तर त्यामध्ये काय निर्णय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”