सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
शिवसेनेचे आमदार तथा मंत्री एकनाथ शिंदे व कोरेगावच्या आमदार महेश शिंदे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन येथे पाठींबा व शुभेच्छा देणारा बॅनर लावला होता. संबंधित बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शिंदे समर्थकांनी वाठार स्टेशन येथील पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या चाळीसहून अधिक आमदारांना घेऊन गुवाहाटी गाठले. यावेळी जिल्ह्यातील पाटण तालुक्याचे आमदार व मंत्री शंभूराज देसाई व कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे हेही शिंदे गटात सहभागी झाले. यावेळी त्यांनी घेतलेल्या भूमिकेला त्यांच्या जिल्ह्यातील समर्थकांकडूनही पाठींबा दिला जात आहे. या दरम्यान जिल्ह्यात ठीक ठिकाणी तालुका, गाव पातळीवर एकनाथ शिंदे व महेश शिंदे समर्थकांकडून पाठींब्याचे व शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन येथे लावण्यात आलेले एकनाथ शिंदे व महेश शिंदे यांचे बॅनर अज्ञात व्यक्तीने दि. 28 रोजी रात्रीच्या सुमारास फाडले. यामुळे या ठिकाणी शिंदे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांच्यातील नितीन नामदेव चव्हाण (रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव) यांनी वाठार पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दिली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केले आहे.