हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कार्यरत असलेल्या सरकारमधील मुख्यमंत्री यांच्या सुरक्षेकडे जास्त लक्ष दिले जाते. एखादा दौरा जरी असला तरी पोलिसांचा खडा पहारा दिला जातो. मात्र, काहीवेळा अचानक हल्ला झाला तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्वसंरक्षणाखातर स्वतःजवळ एखादे शस्त्रे बाळगणं योग्यतेचे ठरेल. इतर राज्यातील मुख्यमंत्र्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील शस्त्रे बाळगतात. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे शस्त्रे आहेत. त्याबद्दल आपण जाणून घेऊया कोणत्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे बंदुका आहेत.
प्रेम सिंह तमांग
प्रेम सिंह तमांग हे भारत देशाच्या सिक्किम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. 1994 सालापासून सिक्कीमच्या राजकारणामध्ये सक्रीय असणारे तमांग सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्षाचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष आहेत. प्रेम सिंह तमांग यांच्याजवळ 3 लाख रुपयांची एक बंदूक आहे. 2019 मधील सिक्कीम विधानसभा निवडणुकीमध्ये सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने 32 पैकी 17 जागांवर विजय मिळवून बहुमत नक्की केले. मुख्यमंत्रीपदावरील पवनकुमार चामलिंग ह्यांच्या 24 वर्षांच्या कारकिर्दीनंतर तमांग सिक्कीमचे सहावे मुख्यमंत्री बनले.
योगी आदित्यनाथ
महंत योगी आदित्यनाथ हे एक भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून 1998 सालापासून गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेही 1 रिव्हॉल्व्हर आणि 1 रायफल अशी 2 शस्त्रे आहेत.
एकनाथ शिंदे
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक शिवसेना नेते असून ते राज्याचे 20 वे मुख्यमंत्री आहेत. या आधी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते. ज्यावेई त्यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र दिले त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे एकूण 5 लाख रुपयांची शस्त्रे आहेत. त्यात 1 रिव्हॉल्व्हर आणि 1 पिस्तूल असल्याचे सांगितले आहे.
शिवराज सिंह चौहान
शिवराजसिंह चौहान हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते 30 नोव्हेंबर 2005 पासून मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते सर्वप्रथम 1991 मध्ये मध्य प्रदेश राज्यातील विदिशा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 2008 व 2013 सालच्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने यशस्वीपणे बहुमत जिंकले व चौहान मुख्यमंत्रीपदावर कायम राहिले. शिवराज सिंह चौहान यांच्याकडे एक रिव्हॉल्व्हर असून त्याची 5 हजार 500 रुपये इतकी किंमत सांगितली आहे.
हेमंत सोरेन
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे भारत देशाच्या झारखंड मुक्ति मोर्चा या पतील एक राजकारणी आहेत. डिसेंबर 2019 पासून मुख्यमंत्री पदावरविराजमान झालेले हेमंत सोरेन हे भारतामधील सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने यश मिळवले व सोरेन मुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे 1 रायफल आहे.
एन बिरेन सिंग
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग हे भारत देशाच्या मणिपूर राज्यामधील एक राजकारणी आहेत. 2002 साली सक्रिय राजकारणात प्रवेश करून बीरेन सिंह मणिपूर विधानसभेवर निवडून आले. 2004 साली ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य बनले व 2016 पर्यंत काँग्रेस पक्षात राहिले. त्यांच्याकडे 1.75 लाख रुपयांची पिस्तुल आहे.
भगवंत मान
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे पंजाब राज्यामधील एक राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व पंजाब राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. 2022 पंजाब विधानसभा निवडणूकीमध्ये मान यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर 16 मार्च 2022 रोजी मान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे 20 हजार रुपयांची बंदूक आहे.
पुष्कर सिंह धामी
पुष्कर सिंह धामी हे भारत देशाच्या उत्तराखंड राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. धामी यांनी 1990 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2012 साली ते सर्वप्रथम उत्तराखंड विधानसभेवर निवडून आले. 2021 साली तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर पुष्कर सिंग धामी यांनी 4 जुलै 2021 रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. धामी यांच्याकडेही केवळ 1 रायफल आहे.