हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या आमदारांसह मुंबई विमानतळावरून विशेष विमानाने ठीक दहा वाजता गुवाहाटीला रवाना झाले. गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण जात असून आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणावरूनच आम्ही गुवाहाटीला जात आहोत. तसेच देवीला राज्याच्या सुखसमृद्धी आणि भरभराटीचं साकडं घालणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मुंबई विमानतळावर दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सत्ता स्थापन केल्यानंतर गुवाहाटीला यावे असे निमंत्रण दिले होते. मात्र, आम्ही गुवाहाटीवरून घाई गडबडीत आलो होतो. त्यामुळे आता आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणानुसार पुन्हा गुवाहाटीला जात आहे. आम्ही श्रद्धेने जात असून त्यात कुणाला काही वाटण्याची अवश्यकता आहे, असं वाटत नाही.
आमचे सर्व आमदार उत्साहात असून आमची देवीवर खूप श्रद्धा आहे. म्हणून आम्ही भक्तिभावाने गुवाहाटीला जात आहे. राज्यासाठीच आम्ही हे करत आहोत. येथील बळीराजाला सुखी होऊ दे, जनतेच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊ दे, राज्यावरील अरिष्ट जाऊ दे ही प्रार्थना करणार आहे.
ही प्रामाणिक भावना आहे. हाच आमचा अजेंडा आहे. बाकी काही दुसरा आमचा अजेंडा नाही. कामाख्या देवीने आमची इच्छा पूर्ण केली. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं. त्यामुळे देवीकडे आणखी काही मागण्याची गरज नाही. आम्ही भक्तीभावाने जात आहोत, असे शिंदे यांनी म्हंटले.