हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यांच्या या सरकारचे काम चांगल्या प्रकारे चालत असल्याने केंद्रातील नेते त्यांच्यावर चांगलेच खुश आहेत. म्हणून लवकरच शिंदे गटाला आता केंद्रातून 2 मंत्रिपद आणि 2 राज्यपाल पद देण्याचा विचार केला जात आहे. शिंदे गटाने याबाबत तशी भाजपकडे मागणी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर आज अमित शहा अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदेंनी केंद्रात शिंदे गटात दाखल झालेल्या कीर्तिकरांना मंत्रिपद मिळावे अशी मागणी केल्याचाही चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. यापूर्वीही शिंदे गटाने केंद्राकडे मंत्रिमंडळात पदाची मागणी केली होती.
शिंदे गटाने शिवसेना गटाबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादी यांनाही धक्का देण्याचे काम सुरु ठेवले आहे. सोलापुरात मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. आता एकीकडे शिंदे गटात वाढत असलेल्या इतर पक्षांतील नेत्यामुळे दुसरीकडे त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळावे यासाठी मुख्यमंत्री शिंदेंकडून प्रयत्न केले जात आहेत.