हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “शिवसेनेतील 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. शिवसेना लोकसभा गट तयार करून 12 लोकांचे पत्र त्यांना दिले. खासदारांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत केले आहे. बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका, आनंद दिघे यांचे विचार हे घेऊन आम्ही महाराष्ट्रात युतीचं आणि जनतेच्या मनातील सरकार स्थापन केलं आहे,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले.
एकनाथ शिंदे यांनी 12 खासदारांसोबत पत्रकार परिषद घेत दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात निवडणूकपूर्व आमची युती होती. महिनाभरात आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. जे अडीच वर्षापूर्वी व्हायला हवे होते, ते आता आम्ही केले आहे. आम्ही सरकार स्थापन केल्यावर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. इंधनापासून शेतीपर्यंतचे अनेक निर्णय घेतले. प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याचे कामही सुरू केलंय. केंद्र सरकारचं आम्हाला पाठबळ मिळत आहे.
पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी काहीच कमी पडू देणार नाही, असे केंद्राने सांगितले आहे. केंद्र आणि राज्य एकत्र येऊन काम करते, तेव्हा त्या राज्याचा विकास वेगाने होत असतो. राज्यात जेवढं चांगलं काम करता येईल ते आम्ही करू, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.