हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मुद्यांसह अनेक गौप्यस्फोट करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहास मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी दोन मोठ्या घोषणाही केल्या. “ज्या हिरकणीने रायगड वाचवला आणि इतिहास घडवला. ते हिरकणी गाव वाचवण्यासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. तर पंतप्रधान मोदींनी इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार लवकरच कॅबिनेट बैठक घेऊन पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्यासाठी निर्णय घेणार असून शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार असल्याचीही घोषणा शिंदे यांनी केली.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सरकार बाळासाहेबांच्या विचारांचे आहे. सर्वांना योग्य निधी देणार आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. आम्हाला भाजीवाला, रिक्षावाला म्हणून हिणवलं. मात्र, आता हे सरकार कष्टकरी, शेतकरी, रिक्षावाला, हॉटेलवाला आणि सर्वसामान्य जनतेचे आहे. प्रत्येकाला आपलस वाटेल असे हे आपले सरकार आहे. बाळासाहेबांचा अजेंडा मोदी सरकार चालवत आहे.
यावेळी एकनाथ शिंदे याची भावूकता, आक्रमकता सभागृहाने पाहिली. यावेळी शिंदे यांनी पेट्रोलबाबत आपली भूमिका मांडली आणि घोषणाही केली.
राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 4, 2022
ते म्हणाले की, जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय कर कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देशातील काही राज्यांनी काही प्रमाणात वॅट कमी केला होता. मात्र, आपल्या राज्याने एक पैशाचाही वॅट कमी केला नव्हता. परंतु, राज्यात नव्याने अस्तित्त्वात आलेले युतीचे सरकार लवकरच यावरील वॅट कमी करण्याचा निर्णय घालणार आहे, असे शिंदे यांनी म्हंटले.