हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न ऐरणीवर आला असून याच पार्श्वभूमीवर दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बसवराज बोम्मई आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. गृहमंत्री अमित शहा शिंदे आणि बोम्मई यांच्यासोबत आज चर्चा करणार आहेत. त्यामुळे सीमाप्रश्नावर तोडगा निघणार हा हे आता पाहावे लागणार आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा सांगितल्यानांतर सीमावादात पहिली ठिणगी पडली. त्यांनतर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकात जाण्यास बंदी घालण्यात आली. याशिवाय महाराष्ट्रातील गाड्यांवर कन्नड भाषिकांकडून सीमाभागात हल्लाही करण्यात आला. त्यामुळे दोन्ही राज्यातील संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही राज्यात भाजपचेच सरकार असल्यामुळे केंद्र सरकार याबाबत काय तोडगा काढणार हे पाहावं लागेल. त्यामुळे अमित शाह यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष्य राहील.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या खासदारांनी 10 डिसेंबर रोजी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली होती. यावेळी खासदारांनी अमित शहांकडे बोम्मई यांची तक्रार केली होत. त्यानंतर आपण १४ डिसेंबरला शिंदे आणि बोम्मई यांच्यासोबत चर्चा करू आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर परस्पर समन्वयानं तोडगा काढू असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली होती.