हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या 50 आमदारांसह गुवाहाटीला जाणार असल्याचे निश्चित झाले असून त्यांच्या या दौऱ्याची तारीखही ठरली आहे. एकनाथ शिंदे 26 आणि 27 नोव्हेंबरला त्यांच्या आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहेत. यावेळी त्यांच्याकडून कामाख्या देवीचं दर्शन घेऊन एका विशेष पूजाही केली जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी करत आपल्या आमदारांसह गुवाहाटी गाठली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर पुन्हा दर्शनाला येईन, असे साकडे कामाख्या देवीला घातले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्रीशिंदेनी त्यांच्या आमदारांसह गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला आहे.
गुवाहाटी दौऱ्यात सत्तासंघर्षावेळी ज्यांनी मदत केली त्यांची एकनाथ शिंदे भेट घेणार आहेत. याआधी 21 नोव्हेंबरला मुख्यमंत्री गुवाहाटीला जाणार असल्याचे सांगितले जात होते. पण व्यग्र वेळापत्रकामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढे ढकलला गेला.