हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दोन्ही नेत्यांची काल रात्री उशिरा नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत भाजपच्या 2 कार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असून त्याजागी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 2 मंत्रीपदे देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती मध्ये काही बदल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. अकार्यक्षम मंत्र्यांना नारळ देऊन नवीन तडफदार नेत्यांना संधी देण्याचा विचार सुरु आहे. त्यानुसार भाजपचे 1 केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि 1 राज्यमंत्र्यांना डच्चू देण्यात येईल तसेच त्याजागी शिंदेंच्या 2 नेत्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात येईल. कोणत्या नेत्याला मंत्रिपद द्यायचे याबाबत सर्व निर्णय एकनाथ शिंदे यांच्यावरच सोपवले आहे.
या निर्णयामुळे भाजपच्या महाराष्ट्रातील 2 मंत्र्यांची मंत्रीपदे धोक्यात आली आहेत. हे 2 मंत्री कोण आहेत याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील 12 अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्याच्या तयारीत भाजप आहे. यामध्ये उत्तर प्रदेशच्या चार ते पाच केंद्रीय मंत्र्यांना हटवले जाण्याची शक्यता असून तेलंगणा, कर्नाटक, पंजाब, व हरियाणामधून प्रत्येकी एका मंत्र्याला डच्चू दिला जाऊ शकतो.